चंद्रपूर 17 नोव्हेंबर (हिं.स.): – महाकृषी ऊर्जा अभियान योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 216 लाभार्थी शेतक-यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
महाकृषी ऊर्जा अभियान योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ऑनलाईन महाऊर्जाच्या कुसुम-ब पोर्टलवर आजपर्यंत एकुण 1 हजार 555 शेतक-यांचे परिपुर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 556 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौरपंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण 1,555 अर्जापैकी 216 लाभार्थी शेतक-यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन एसएमएस पाठविण्यात आले आहे. तसेच महाऊर्जा जिल्हा कार्यालयाकडून सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटीपुर्तता करण्याकरीता भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांकडून त्रुटीपुर्तता करण्यात आली नाही.
या व्यतिरीक्त 376 शेतक-यांचे अर्ज अपूर्ण आहेत. याअनुषंगाने, अपुर्ण व त्रुटी अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या युजरनेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टलवर आवश्यक त्रुटी असलेले कागदपत्रे अपलोड करुन त्रुटी व अपुर्ण अर्जाची पुर्तता करावी. या करीता महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/benefshome या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कागदपत्रे अपलोड होत नसल्यास किंवा कुठलीही अडचण उद्भवल्यास महाऊर्जा जिल्हा कार्यालय, गाळा क्र. 4 आणि कार्यालय क्र. 1 गझ टॉवर वडगाव फाटा, एनफिल्ड शोरूम समोर नागपुर रोड, चंद्रपूर येथे भेट द्यावी. अथवा कार्यालयीन वेळेत E-mail: [email protected] तथा 07172-256008 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
दरम्यान जे लाभार्थी येत्या सात दिवसात त्रुटीपुर्तता करणार नाही त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येणार नाही. मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा प्रथम त्रुटीपुर्तता करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल. तेव्हा, संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा जिल्हा कार्यालयात संपर्क करून अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटीबाबत विचारणा करावी तसेच प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटीपुर्तता करून घ्यावी, असे आवाहन महाऊर्जा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक नितीन पाटेकर यांनी केले आहे.
तालुकानिहाय त्रुटीतील लाभार्थी अर्जाची संख्या:-
वरोरा 3, चिमुर 64, नागभीड 12, ब्रम्हपुरी 44, सावली 9, सिंदेवाही 6, भद्रावती 3, चंद्रपूर 12, मुल 10, पोंभुर्णा 7, बल्लारपूर 1, कोरपना 10, जिवती 5, राजुरा 21 तर गोंडपिपरी 2 असे एकुण 216 लाभार्थी त्रुटीमध्ये आहेत.
हिंदुस्थान समाचार
