* विराटकडून मानाचा मुजरा, सचिनकडून अभिवादन
मुंबई, १५ नोव्हेंबर (हिं.स.) : भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 49 एकदिवसीय शतके झळकावली होती, मात्र आता विराट कोहलीने त्याचाही विक्रम मोडला आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत ५०व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटने हा विक्रम नावावर केला. विराटने कोहलीनं शतक ठोकल्यानंतर वानखेडे मैदानात उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकरला मानाचा मुजरा केला. सचिननं सुद्धा मानाचा मुजरा स्वीकारत अभिवादन केलं.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा दुसरा फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 80 वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर 29, तर ट्वेन्टी 20 प्रकारात एका शतकाची नोंद आहे. 2009 मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. 14 वर्षांनंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं वनडे प्रकारातील न्यूझीलंड विरुद्धचं हे सहावं शतक असून मायदेशातील त्याचे हे 22 वं शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. ज्याने आपल्या कारकिर्दीत 100 शतके झळकावली. सचिनने आपल्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामने खेळले. विराट आपला 291 वा वनडे सामना खेळत आहे. याशिवाय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे.
दरम्यान, कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या. पण आता या विक्रमावर कोहलीचेही नाव कोरले आहे. विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात कोहली हा एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
हिंदुस्थान समाचार
