रत्नागिरी, 11 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात परशुराम राऊत, श्रद्धा इंगळे तर १३ वर्षांखालील गटात विश्वजित ठावली, सोयरा शेलारने विजेतेपद पटकावले.
रत्नागिरीतील सर्वंकष विद्यामंदिरच्या बॅडमिंटन कोर्टवर या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाल्या. स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात परशुराम राऊतने जतीन सराफचा पराभव केला. मुलींमध्ये श्रद्धा इंगळेने हेजल जोशीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीमध्ये जयदेन मॅथ्यु-रुद्रा मनोहर या जोडीने यश अग्रवाल-योहान कल्याणी यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. तेरा वर्षांखालील गटात विश्वजित ठावलीने मयूरेश भुक्तीवर मात केली. मुलींच्या गटात सोयरा शेलारने वैष्णवी मांगलेकरचा पराभव केला.
दुहेरीत मयूरेश भुक्ती-विश्वजित ठावली या जोडीने सयाजी शेलार-उदयन देशमुख या जोडीचा पराभव करत विजेदेपद पटकावले. आदिती यादव-प्रांजल दधिआ या जोडीचा रिशा परब-श्रावणी बामणकर यांनी पराभव केला. विजयी झालेल्या खेळाडूंचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गद्रे सी फूड्सच्या संचालिका सौ. मीनाताई गद्रे, सावंत ओयासिसचे केतन सावंत, देसाई फूड प्रॉडक्ट्सचे अमर देसाई, करुण्या मरिनचे कुरियन अब्राहम, स्टेट टॅक्स ऑफिसर ठोंबरे, महावितरणचे असिस्टंट जनरल मॅनेजर वैभव थोरात, भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सरोज सावंत, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, प्रशिक्षक समितीचे सदस्य अमित मुळ्ये, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश आराध्यमठ, प्रशिक्षक विनीत पाटील, प्रशिक्षक सुधीर बाष्टे, प्रशिक्षक सुधीर चेनूर आदी उपस्थित होते.
कारुण्य मरिनचे कुरियन अब्राहम यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. स्पर्धेला गद्रे सी फूड्स, इंडियन ऑइल, सावंत ओयासिस स्पोर्ट्स, देसाई फूड प्रोडक्ट्स, कारुण्या मरिन आणि योनेक्स सनराईस यांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनवर सलग दहा वर्षे विश्वास ठेवून आणि पाठिंबा देऊन स्पर्धा घेण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे आभार मानण्यात आले. स्पर्धेला राज्यभरातून तीनशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
हिंदुस्थान समाचार
