मुंबई, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) – पीरामल ग्रुपचे लोकोपकारी कार्य चालवणारे पीरामल फाउंडेशन, सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलने (केईएम) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने हातमिळवणी करून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या आरोग्य देखभालविषयक गरजा पूर्ण करण्याचे ठरवले आहे. यासाठी करण्यात आलेल्या एका तीन-वर्षीय समझोता करारात नमूद केल्याप्रमाणे या जिल्ह्यांमधील २८ लाख आदिवासींच्या कल्याणामध्ये सुधारणा घडवून आणणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
हा उपक्रम पालघर जिल्ह्यात सुरु होईल आणि त्याठिकाणी राहणाऱ्या ६८% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येवर प्रभाव घडवून आणेल. याठिकाणी मिळालेले प्रतिसाद आणि निष्कर्षांच्या आधारे इतर जिल्ह्यांमध्ये देखील त्याचा विस्तार करण्यात येईल. आरोग्य सूचकांकामध्ये दरवर्षी ६ ते ८ टक्क्यांची वाढ करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आदिवासी समुदायामधील कुपोषण, माता व बालक आरोग्य, ऍनिमिया आणि टीबी यासारख्या समस्यांचे निवारण करण्यात येईल.
ही भागीदारी आजार व्यवस्थापनाच्या उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक पैलूंमध्ये सुधारणा घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करेल. केईएम हॉस्पिटल पीरामल फाऊंडेशनला त्यांच्या महत्त्वाकांक्षी भारत सहयोग कार्यक्रमांतर्गत तांत्रिक सहाय्य प्रदान करेल, ज्यामध्ये लक्ष्यित जिल्ह्यांतील आघाडीच्या आरोग्य कर्मचार्यांसाठी टेलिकन्सल्टेशन डायग्नोस्टिक सपोर्ट आणि क्षमता निर्माण प्रशिक्षण यांचा समावेश आहे. शिवाय, जिल्हास्तरीय आरोग्य कर्मचारी, आदिवासी उपचार करणारे आणि वैद्यकीय विद्यार्थी स्वयंसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन आरोग्य सेवा क्षमतांना चालना देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्या सोडविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. आदिवासी उपचार करणाऱ्यांचे आदिवासी समाजातील महत्त्व ओळखून त्यांना प्राथमिक आरोग्य सेवेचे प्रशिक्षण दिले जाईल. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्य़ांमध्ये फेलोशिप प्रोग्रामद्वारे, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सामुदायिक सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवक बना, शिका आणि शिकवा यासाठी एक संयुक्त अभ्यासक्रम तयार करण्याची योजनाही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहे.
पीरामल ग्रुपच्या उपाध्यक्ष, डॉ. स्वाती पीरामल म्हणाल्या, पीरामल फाऊंडेशनमध्ये, आम्ही वंचित समुदायांचे कल्याण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आम्ही सरकारी यंत्रणा मजबूत करून आणि तरुण व्यक्तींच्या ऊर्जा आणि समर्पित वृत्तीचा सुयोग्य उपयोग करून घेऊन हे साध्य करतो. निःस्वार्थ सेवाभाव ही आमची प्रेरणा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने, सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल (केईएम) सोबत ही भागीदारी, राज्यभरातील आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी आमची सर्वांची वचनबद्धता दर्शवते. आरोग्यसेवांमध्ये प्रगती घडवून आणून, सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याप्रती आमची समर्पित वृत्ती दर्शवणे, चांगले करावे या आमच्या मूळ तत्त्वज्ञानाचे पालन करावे हा या भागीदारीचा उद्देश आहे.
केईएम हॉस्पिटल आणि सेठ जीएस मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ संगीता रावत यांनी सांगितले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने पीरामल फाउंडेशन आणि केईएम हॉस्पिटलची ही भागीदारी आरोग्यसेवेमध्ये परिवर्तनाचा मार्ग प्रस्तुत करेल. सेवांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवांचे अधिक सुधारित परिणाम घडवून आणण्याच्या समान उद्दिष्टासह तज्ञ आणि संसाधने यांचे एकत्रीकरण यामध्ये घडवून आणले जात आहे. ही भागीदारी प्रगतीचा प्रकाशस्तंभ ठरेल, लक्ष्यित समुदायांना लाभ प्रदान करेल आणि व्यापक आरोग्य सेवा लँडस्केपसाठी एक प्रशंसनीय उदाहरण प्रस्थापित करेल.
आपल्या टेलिमेडिसिन विंगमार्फत केईएम हॉस्पिटल क्लिनिकल सहाय्य देखील प्रदान करेल, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वे पुरवेल आणि आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे संशोधन आणि दस्तऐवजीकरण करेल. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर), कमांड अँड कंट्रोल सेंटर (सीसीसी) आणि प्रत्यक्ष भागांमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची डिजिटल क्षमता वाढवणे यासारख्या डिजिटलायझेशन उपक्रमांवरही ही भागीदारी लक्ष केंद्रित करेल.
कार्यक्रमाच्या सर्वसमावेशक अजेंड्यात व्हीएचएसएनडी साइट्सची स्थापना, अॅनिमिया मुक्त अभियान, क्षयरोगमुक्त उपक्रम, बालक आणि माता यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, कुपोषण आणि असंसर्गजन्य रोगांवर उपाय करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि शालेय आरोग्य कार्यक्रम राबवणे यांचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार
