अधिकाऱ्यावर 15 लाखांची लाच घेतल्याचा आरोप
जयपूर, 02 नोव्हेंबर : मणिपूरच्या इम्फाल येथे तैनात असलेला अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) अधिकारी आणि त्याच्या साथीदारला राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलीय. चिटफंड प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्याने 15 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
यासंदर्भातील निवेदनात राजस्थान एसीबीने म्हटले आहे की, अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकारी नवल किशोर मीणा आणि त्याचा स्थानिक सहकारी बाबूलाल मीणा यांचा समावेश आहे. यासंदर्भात एसीबीला प्राप्त तक्रारीनुसार चिटफंड घोटाळा प्रकरणी एका आरोपीच्या विरोधात मणिपूरच्या इम्फाल येथे खटला दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी नवल किशोर मीणा यांनी आरोपीकडे 17 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने ईडीच्या अधिकाऱ्याला 15 लाख रुपयांची लाच
घेताना अटक केली. नवल किशोर हा जयपूर जिल्ह्यातील बस्सी येथील विमलपुरा गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे, तर त्याचा सहकारी बाबूलाल हा नव्याने स्थापन झालेल्या कोटपुल्टी-बेहरोर जिल्ह्यातील मुंडावार येथील उपनिबंधक कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
