नाशिक,३१ ऑक्टोबर (हिं.स.) : अशोका युनिव्हर्सल स्कूलचा विद्यार्थी राम हेमंत कोठावळे याने मुंबई येथे आयोजित सी आय एस सी ई जिम्नॅस्टिक्स टूर्नामेंट २०२३ मध्ये एक उत्कृष्ट खेळ खेळत स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले आहे.
रामने जिम्नॅस्टिक खेळातील उत्तम कौशल्याच्या जोरावर तब्बल सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदकासह प्रादेशिक सी आय एस सी ई स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्ट चा प्रतिष्ठित मान मिळवला आहे. याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड झाली आहे.
रामची खेळाबद्दलची चिकाटी आणि अमर्याद ऊर्जा स्पर्धेत उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रोत्सहीत करेल अशीच होती, आणि त्यामुळेच स्पर्धेत एक चैतन्यमय आणि आनंददायक वातावरण निर्माण झाले. त्याच्या विलक्षण जिम्नॅस्टिक कौशल्याने प्रेक्षकांना अचंबीत केले. रामच्या उत्कृष्ट खेळाने कार्यक्रमाच्या एकूण यशात मोठे योगदान दिले. अशोका युनिव्हर्सल स्कूलमधील आशिष काळे आणि रणवीर आहेर या दोन गुणी विद्यार्थ्यांचीही राखीव गटात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
