नवी मुंबई, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ वर्षी नेरुळ येथील त्यांच्या गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (२७ ऑक्टोबर) संध्याकाळी नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रासह जगभरात ज्ञात असून त्यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला.
दरम्यान आज, गुरुवार त्यांचे पार्थिव दुपारी ३ नंतर अंतिम दर्शनासाठी नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात आले.
परिचय
बाबा महाराज सातारकर यांचे खरे नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातार्यामध्ये झाला होता. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबा महाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची विशेष आवड होती.
बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबा महाराजांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा बाबा महाराजांनी पुढे सुरू ठेवली. बाबा महाराज सातारकर परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचे शिष्य झाले. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज सातारकर श्री सद्गुरु दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून बाबा महाराज सातारकर यांनी पुरोहित बुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
मानकरी म्हणून परंपरा
१९५० ते १०५४ या कालावधीमध्ये बाबा महाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. मात्र पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी होण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली.
हजारो भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा
आप्पा महाराजांच्या देहावसनानंतर १९६२ सालापासून त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली. समाजप्रबोधनाचे कार्य म्हणून डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबा महाराजांनी सुरू केली. पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बाबा महाराजांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले होते. बाबा महाराजांनी सुमारे १५ लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली. ६० ते ७० हजार भाविकांना या संस्थेमार्फत विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधं पुरवली जातात.
हिंदुस्थान समाचार
