नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : दसऱ्याला रावणाचे दहन हे केवळ एका पुतळ्याचे दहन नसून समाजातील एकोपा बिघडवणाऱ्या प्रत्येक विकृतीचे दहन आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील द्वारका सेक्टर 10 येथील रामलीला मैदानावर रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. याठिकाणी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.रावण दहन करण्यापूर्वी त्यांनी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रूपांची आरती केली.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विजयादशमी हा सण देशाच्या जवळपास सर्वच भागात साजरा केला जातो. या दिवशी रामाने रावणाचा वध केला. अन्यायाचे प्रतिक असलेल्या रावणावर प्रभू श्रीरामाच्या विजयाचा हा सण आहे. म्हणूनच आपण दरवर्षी रावण दहन करतो. हा सण आपल्यासाठी संकल्पांचा उत्सव आहे, त्याची पुनरावृत्ती करण्याचा सण आहे. चांद्रयान चंद्रावर जाऊन दोन महिने पूर्ण होत असताना यावेळी आपण विजयादशमी साजरी करत आहोत.आपल्याला गीतेचे ज्ञान आहे आणि विज्ञान देखील माहित आहे. नवरात्रीत जगदंबेचे स्मरण करण्यासाठी शक्तीपूजनाचा संकल्प आणि मंत्र देखील आपल्याला माहित आहेत. विजयादशमी हे या विचारांचे प्रतीक आहे. आज आपण भाग्यवान आहोत की आपल्याला राम मंदिराचे बांधकाम पाहायला मिळत असल्याचे मोदी म्हणाले.दसऱ्याला सावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपण सामाजिक एकोपा बिघडवणाऱ्यां विकृतीचे दहन करतो. भारतमातेचे विभाजन करण्याचे काम करणाऱ्या त्या शक्तींचे. तो विकास ज्यामध्ये भारताचा विकास नसून त्यांच्या विकासाचे हित दडलेले आहे. देशाच्या प्रत्येक वाईटाविरुद्ध देशभक्तीचा उत्सव साजरा केला पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
पुढील रामनवमीला अयोध्येतील रामलला मंदिरातील पूजा संपूर्ण जगाला आनंद देणार आहे. प्रभू राम जन्मभूमीवर उभारले जाणारे भव्य मंदिर, हे दिव्य मंदिर शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर भारतीयांच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रभू रामाचा राम मंदिरात वास होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. आपण काही आठवड्यांपूर्वीच संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केला. स्त्री शक्तीला सन्मान देण्यासाठी संसदेने नारी शक्ती वंदन कायदा मंजूर केला. जग भारताकडे लोकशाहीची माता म्हणून पाहत आहे. प्रभू रामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे असे मोदींनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
