पुणे, 21 ऑक्टोबर : उशिराने झालेल्या पेरण्या, ऑगस्टमध्ये पावसाने दिलेली ओढ आणि पावसाअभावी यलो मोझॉक रोगाचा, अळीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्क्यांहून जास्त घट येत आहे. त्यात भर म्हणून बाजारात हमीभावाइतकाही दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पुरेशा पावसाअभावी पेरण्या उशिराने झाल्या. जुलैच्या अखेरीस पेरण्या झाल्या. वाढीच्या, फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही. शेंगा भरल्या नाहीत. सोयाबीनचे दाणे लहान राहिले आहेत.
ऑगस्टमधील उघडीप आणि उष्णतेमुळे यलो मोझॉक रोगाचा प्रादुर्भाव झाला. पिके पिवळी पडली, अनेक ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आलेल्या शेंगाही अळ्यांनी कुरतडून टाकल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्क्यांहून जास्त घट येत आहे.
