नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःची ओळख निर्माण केलीय. तसेच वहिदा महिला सक्षमीकरणाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्या दिल्लीत आयोजित 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी वहिदा रेहमान यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वहिदा रेहमान यांचे अभिनंदन करताना सांगितले की, वहिदा रेहमान यांनी स्वाभिमान ,आत्मविश्वास असलेली स्त्री म्हणून आपला ठसा उमटवला होता. त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यात त्यांच्या भूमिकांनी विशेषत: स्त्रियांशी संबंधित अनेक बंधने तोडली होती. महिला सक्षमीकरणासाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा, असा आदर्श वहीदाजींनी घालून दिल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल राष्ट्रपती म्हणाल्या की, हा पुरस्कार सोहळा भारतातील विविधतेचे आणि एकात्मतेचे चित्र रंगवतो. सोहळ्याला उपस्थित प्रतिभावान लोकांनी अनेक भाषा, प्रादेशिक वैशिष्ट्ये, सामाजिक आस्था, कामगिरी आणि समस्यांना सार्थ अभिव्यक्ती दिली आहे आणि हे सर्व पिढ्यांमधील आणि श्रेणींमधील लोक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र आले आहेत. चित्रपट उद्योग आणि कलाकार हे परिवर्तन घडवणारे आहेत असे सांगत , भारतीय समाजातील वैविध्यपूर्ण वास्तवाचा जिवंत परिचय ते त्यांच्या चित्रपटांमधून करून देतात. भारतासारख्या प्रतिभासंपन्न देशात, चित्रपटक्षेत्राशी संबंधित व्यक्ती जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेचे नवे मापदंड यापुढेही निर्माण करत राहतील आणि त्यांनी निर्माण केलेले चित्रपट विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.
