पुणे , 16 ऑक्टोबर (हिं.स.) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी रेल्वे स्थानकालगतच्या आणि डॉ. आंबेडकर रस्त्यावरील लोहमार्ग नूतनीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेला १०० वर्षे जुन्या सेवा वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे आणि रस्ता रुंदीकरणाचे काम करता येणार आहे. परिणामी, या भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र या तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये मेट्रो प्रकल्प, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. खडकी रेल्वे स्थानकापासून १०० मीटर अंतरावरच खडकीतील मुख्य लोहमार्गापासून उजवीकडे किर्लोस्कर कंपनी, दारूगोळा कारखान्याकडे जाणारा लोहमार्ग आहे. मिलिटरी साईडींग, खडकी येथील लेव्हल क्रॉसिंग एक व दोन असा त्यांचा उल्लेख करण्यात येतो. याच क्रॉसिंगवरील लोहमार्ग दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम रेल्वे प्रशासन करणार आहे. महापालिकेला या संधीचा फायदा होणार आहे.
हिंदुस्थान समाचार
