पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.) :पुणे विमानतळावर रविवारी प्रवाशांची व विमानांची गर्दी झाली. तब्बल ९९ विमानांचे उड्डाण झाले व ९९ विमानांचे लँडिंग झाले. मागील दोन वर्षांतला हा सर्वाधिक मोठा आकडा आहे. सामान्यपणे पुणे विमानतळावरून दररोज ८५ ते ९० विमानांचे उड्डाण होते. विमानांच्या संख्येत वाढ झाली. विमानांची संख्या वाढल्याने धावपट्टी देखील व्यस्त होती. त्यामुळे अहमदाबाद येथून भारतीय क्रिकेट टिमच्या खेळाडूंच्या विमानास देखील ‘गो अराऊंड (विमानतळास चक्कर) देण्यात आला.
कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून एके दिवशी १०० विमानांचे उड्डाण व लॅंडिंग झाले होते. त्यानंतर विमानांनी ९९चा आकडा गाठला. विमानांची संख्या वाढल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. एका पाठोपाठ चार विमाने दाखल झाले. त्यात भारतीय क्रिक्रेट टिमच्या खेळाडूंना अहमदाबादहून आणणारे विमान देखील होते. दिल्लीसाठी २० विमानांनी उड्डाण घेतले. पुण्याहून सर्वाधिक विमान दिल्लीसाठी झेपावले. एकाच दिवशी सुमारे १९८ विमानांची वाहतूक झाली. सुमारे ३० हजार प्रवाशांची वाहतूक झाल्याचा अंदाज पुणे विमानतळ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हिंदुस्थान समाचार
