मुंबई, 15 ऑक्टोबर : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) शनिवारी पनामा ध्वज असलेल्या जहाज एमटी हुआ वेई 8 या जहाजावरील चिनी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय उपचारासाठी सुखरुप सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाचे मुंबई येथील सागरी बचाव समन्वय केंद्र, भारतीय पश्चिमी तटावरील सागरी शोध आणि बचाव समन्वयक चमूला 13 ऑक्टोबर रोजी उशिरा, वाहक बोट उपलब्ध न झाल्यामुळे 49 वर्षीय चिनी कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी चिनी जहाजाकडून विनंती करण्यात आली होती.
या चिनी कर्मचाऱ्याला पक्षाघाताचा त्रास होता. हे चिनी जहाज न्यू मंगळुरू ते बिन कासिम, पाकिस्तान असा प्रवास करत होते आणि ते मुंबईपासून 122 सागरी मैलांवर होते आणि वैद्यकीय मदतीसाठी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग बदलण्याचा विचार करत होते.
या रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेता, त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतीय तटरक्षक दलाने आपले C-439 हे जहाज तैनात केले. अत्यंत कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत, भारतीय तटरक्षक दलाने सकाळी 8. 30 वाजता या रुग्णाची जहाजातून सुखरूप सुटका केली आणि त्याला मुंबई बंदरात उतरवले.
त्यानंतर पुढील वैद्यकीय मदतीसाठी या रुग्णाला मुंबई बंदरावरील स्थानिक कर्मचाऱ्याकडे सोपवण्यात आले. या मदतीमुळे सागरी सुरक्षेप्रति भारतीय तटरक्षक दलाची वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून आली.
