मुंबई, 14 ऑक्टोबर : मराठी ओरिजिनल सिरीज ‘शांतीत क्रांती’ला भव्य यश मिळाल्यानंतर सोनी लिव्ह या मराठी ओरिजिनलचा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन रिलीजसाठी सज्ज झाला आहे. कथानकामध्ये नवीन ट्विस्टची भर करत निर्मात्यांनी सिरीजमध्ये दोन नवीन कलाकारांचा समावेश केला आहे. या सीझनमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील उल्लेखनीय परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय असलेली प्रियदर्शिनी इंदळकर समृद्धीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने ‘हिंदुस्थान समाचार’शी प्रियदर्शिनी इंदळकरने संवाद साधला.
1. शांतीत क्रांती २ चा ट्रेलर सर्वांनी पाहिला आणि त्या ट्रेलर मध्ये तुला पाहून तुझ्या फॅन्सची काय प्रतिक्रिया होती ?
– शांतीत क्रांती २ या सीरिजचा एक भाग असल्यामुळे माझे चाहते खूश आहेत. शांतीत क्रांतीचे आधीच चाहते आहेत आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचेही चाहते आहे. मी या सिरीजचा एक भाग असल्यामुळे या दोन्ही कडचे चाहते खूश झाले आहे.
2. शांतीत क्रांती २ बद्दल काय सांगशील ?
– शांतीत क्रांतीचा दुसरा सिझन हा जास्त मनोरंजक आहे. शांतीत क्रांती २ मध्ये मी भूमिका साकारली आहे म्हणून खूश आहे. यामुळे मी खूप आंनदी आणि उत्साही आहे.
3. चित्रीकरणातील कोणतीही घटना किंवा क्षण नेहमी तुझ्यासोबत राहतील असे तुला वाटते ?
– या शूटिंगमुळे माझा खूप प्रवास झाला. जानेवारी महिन्यात उत्तराखंडमध्ये शूट झालं. त्या हवेमध्ये, त्या थंडीमध्ये आम्ही शूट केलं. तो अनुभव माझ्यासाठी अवर्णनीय होता. आणि हा अनुभव माझ्यासोबत कायम राहणार आहे.
तिथं गेल्यावर मला वेगळीच शांतता मिळाली. त्यामुळे खूप शांत डोक्याने मी या सीरिजमध्ये काम केलं. उत्तराखंडमधील वातावरण, तिथली थंडी, तिथली झाडं, तिथले रस्ते, तिथली घरं, गंगा नदी या सगळ्या गोष्टी अनुभवून खूप सुंदर वाटलं. मी तिथून एक डायरी घेऊन आले होते. आणि या वर्षी कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे हे मी त्यात लिहून ठेवलं आणि आता त्यावर मी काम करतेय.
4. प्रेक्षकांसाठी या सिरीजमध्ये काय संदेश आहे ?
– ही सिरिज मनोरंजक आहे. यात धम्माल मस्ती आहे. कुटुंबासोबत बसून ही सिरिज तुम्ही बघू शकता. यातील सगळी पात्र खूप भारी आहेत. यात काही भावनिक क्षण देखील आहेत.
या सिरिजमधली गोष्ट प्रचंड रंगली आहे. आणि ती करतानाच आम्हाला खूप मज्जा आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असेल याची आता आम्ही वाट बघत आहोत. यातील एका तरी पात्राला तुम्ही स्वतःला रिलेट कराल.
५. पडद्यामागचे काही धमाल मजा मस्तीचे किस्से जे तुला शेअर करायला आवडतील ?
– मथुरेत शूट करताना माकडांचा खूप त्रास झाला. तिथली माकडं वस्तू पळवत होते. त्यामुळे त्यांना फ्रूटी द्यावी लागत होती त्यामुळे माकड आपली वस्तू परत देत होते.
सारंगचा चष्मा एका माकडाने पळवला होता. त्या माकडासमोर हात जोडून त्याला विनंत्या करून त्याच्यासोबत बडबड केली आणि शेवटी त्या माकडाने तो चष्मा खाली टाकला. त्यामुळे शूट करताना माकडांनी खूप धम्माल आणली.
६. शांती क्रांतीमधील तू साकारलेल्या पात्रात काही साम्य आहे का ?
– माझ्यात आणि मी साकारलेल्या पात्रात बरच साम्य आहे. कदाचित काही वर्षांनी प्रियदर्शनी ही समृद्धी सारखी वागू शकते. ब-याच गोष्टी प्रियदर्शनी आणि समृद्धीच्या सेम आहेत.
मात्र, मी ख-या आयुष्यात श्रेयस सारखा पाटर्नर शोधायला जाऊ शकत नाही, ते फक्त समृद्धीच करू शकते. या सिरिजमधल्या माझ्या पात्राने जी मज्जा मस्ती केलीय ती प्रियदर्शनीने खूप रिलेट केली आहे.
७. या शोसाठी तुझं सिलेक्शन कसं झालं ?
– शांतीत क्रांतीच्या पहिल्या सिझनच्या प्रमोशनसाठी सगळे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत आले होते. त्याचवेळी सारंग आणि माझी भेट झाली. त्यानंतर सोशल माीडियाच्या माध्यमातून आम्ही संपर्कात आलो. याचदरम्यान त्याने मला ऑडिशनसाठी विचारलं. त्यावेळेस माझ्यासोबतीला कोणीच नव्हतं त्यामुळे मी सारंगसोबत ही ऑडिशन केली. या आधी कुठल्याच ऑडिशनला मला इतकी मज्जा आली नव्हती जितकी मज्जा शांतीत क्रांतीच्या ऑडिशनला आली. तसेच यापेक्षा जास्त मज्जा मला अभय महाजनसोबत काम करताना आली.
८. भाडिपाच्या सदस्यांसोबत काम करण्याची तुझी ही पहिलीच वेळ होती का ?
– होय, भाडिपाच्या सदस्यांसोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.
