पुणे 7ऑक्टोबर : पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठीचे पैसे अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८० हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. आणखी सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचे पैसे जमा करण्याचे काम शिल्लक आहे.महापालिकेच्या शिक्षण मंडळाने २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया न काढता हे पैसे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दप्तर, गणवेश, वह्या, पुस्तके, स्वेटर, बूट, मोजे यासह इतर साहित्याचा समावेश आहे. हे पैसे आॅगस्ट महिन्यात मिळणे आवश्यक आहे.पण प्रशासकीय गोंधळात विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यास उशीर झाल्याने महापालिकेच्या शाळेतील गरीब विद्यार्थी अद्यापही जुने गणवेश घालून शाळेत येत आहेत. तसेच अनेकांकडे पुरेसे शैक्षणिक साहित्यही नाही. भांडार विभागाला वस्तूंचे दर निश्चित करण्यास व शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यास झालेल्या विलंबामुळे आॅक्टोबर महिन्यापर्यंत पैसे जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पहावी लागली आहे.
