* आतापर्यंत चौघांना अटक * अनेक बाॅलिवूड कलाकारांचा संबंध
मुंबई, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तसेच ॲपशी संबंधित लोकांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत ईडीने श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स पाठवून चौकशी केली आहे. ‘कुरैशी प्रोडक्शन्स’ला सिनेमा बनवण्यासाठी महादेव ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांच्याकडून पैसे मिळाले आहेत. हाच धागा धरून ईडीने मुंबईतील या प्रोडक्शन हाऊसवर छापेमारी केली आहे.
ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आतापर्यंत ईडीने चौघांना अटक केली आहे. यामध्ये सुनील दममानी, अनिल दममानी, चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुनील आणि अनिल दममानी हे भाऊ आहेत, तर चंद्रभूषण छत्तीसगड पोलिसात एएसआय आहे. महादेव बेटिंग अॅप ऑपरेट करण्यासाठी मलेशिया, थायलंड, भारत, युएई येथे कॉल सेंटर उघडण्यात आली आहेत. येथून सहायक अॅप तयार करून ऑनलाइन सट्टेबाजी केली जात होती. महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून हजारो कोटींचे व्यवहार झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. अंडरवरर्ल्ड बॉलिवूडच्या प्रॉडक्शन हाऊसला पैसा पुरवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
अधिक माहिती अशी की, वसीम आणि तबस्सुम कुरैशी हे कुरैशी प्रोडक्शनचे मालक आहेत. या प्रोडक्शन हाऊसने मागील काही वर्षांपूर्वी बॉलिवूड कलाकारांसोबत बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे तयार केले आहेत. महादेव ऑनलाइन बेटिंग केस प्रकरणात आतापर्यंत १७ बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. या ॲपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल असून ते दुबईत बसून हे ॲप ऑपरेट करतात. याच वर्षी महादेव ॲप चालवणारा सौरभ चंद्राकरने युएईमध्ये लग्न केले आहे. या लग्नात २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या ग्रँड वेडिंगसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, कलाकार, गायकांना त्याच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्या लग्नात उपस्थित असलेल्या कलाकारांना मुंबईतील एका इव्हेंट कंपनीद्वारे मानधन देण्यात आल्याची माहिती आहे. लग्नात त्याने पाण्यासारखा पैसा उडवला होता. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी त्याने नागपूर ते युएईपर्यंत खास प्रायव्हेट जेट्सची सोय केली असल्याचीही माहिती आहे.
सध्या हे कुरैशी प्रॉडक्शन हाऊस बॉलीवूडच्या एका टॉप स्टारला घेऊन बिग बजेट चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट स्थानिक भाषेत बनवला जात असून तो इतर भाषांमध्ये डब केला जाणार असल्याचेही तपासात समोर आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात देखील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका आहे.
हिंदुस्थान समाचार
