10 ऑक्टोबरला पंतप्रधान करणार भारताच्या चमूचे स्वागत
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूने, 100 पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे, संपूर्ण देश रोमांचित झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे।
या विजयी चमूचे पंतप्रधान येत्या 10 ऑक्टोबर रोजी स्वागत करणार असून त्यांच्याशी संवादही साधणार आहेत।
पंतप्रधानांनी आज एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे: त्यात म्हटले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एक ऐतिहासिक कामगिरी!
आपल्या खेळाडूंनी 100 पदकांचा मैलाचा टप्पा पार केल्या बद्दल संपूर्ण देश रोमांचित झाला आहे।
अशी अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच आज भारत हा ऐतिहासिक क्षण बघू शकतो आहे।
प्रत्येक खेळाडूच्या विस्मयचकित करणाऱ्या या कामगिरीने इतिहास घडवला आणि आमची हृदये अभिमानाने भरली आहेत।
येत्या 10 तारखेला आमच्या आशियाई खेळांच्या चमूचे आयोजन करण्यास आणि आमच्या खेळाडूंशी संवाद साधण्यास मी अत्यंत उत्सुक आहे।”
